Saturday 31 August 2013

इंग्रजी शिकण्यासाठी नंदाईंनी लिहिलेल्या पुस्तकांच्या प्रकाशनाच्या वेळी स्‌दगुरु बापूंनी केलेले भाषण


मला खात्री आहे की आतापर्यंत तुमच्यापैकी बहुतांश लोकांना माहीत झालं असेल की रविवार, दि. २५ ऑगस्ट २०१३ रोजी परमपूज्य बापू, नंदाई व सुचितदादांच्या उपस्थितीत, ’हॅपी इंग्लिश स्टोरीज’ ह्या सिरीज अंतर्गत स्वत: नंदाईंनी लिहिलेल्या ’साई फॉर मी’ ह्या पुस्तकांचा पहिला संच एका भव्य प्रकाशन सोहळ्याच्या निमित्ताने प्रकाशित झाला. नंदाईंच्या आत्मबल वर्गांमध्ये वरिष्ठ शिक्षिका व कार्यकर्ता सेवक म्हणून काम पाहणार्‍या श्रीमती दूर्गावीरा वाघ ह्यांच्या हस्ते ह्या पुस्तकांचे प्रकाशन झाले. ही पुस्तकं प्रकाशित करण्यामागे, नवशिक्या लोकांबरोबरच, ज्यांचे इंग्रजी भाषेवर बर्‍यापैकी प्रभुत्व आहे, अशा लोकांचीसुद्धा बोलीभाषा व लिखित भाषा सुधारण्याचा हेतू ठेवण्यात आला आहे. 
ह्या पुस्तकांच्या प्रकाशनाच्या निमित्ताने ’बुक्शनरी पब्लिशिंग हाऊसने’ प्रकाशन क्षेत्रात दिमाखात प्रवेश केला आहे. बुक्शनरी पब्लिशिंग हाऊसतर्फे पुस्तकांच्या स्वरूपात चांगल्या प्रतीचे, वैविध्यतेने भरलेले वाङमय उपलब्ध होईलच; शिवाय पुढील काळात सीडी, डीव्हीडी, ई-बुक्स व इतर आधुनिक सुविधा वापरून विविध विषयांवर वाचकसमुदायास उपयुक्त ठरेल अशा स्वरूपात वाङमय उपलब्ध होणार आहे. 
’रामराज्य’ ह्या विषयावर दृष्टीक्षेप टाकताना, बापूंनी ६ मे २०१० रोजी झालेल्या प्रवचनात अनेक प्रापंचिक व आध्यात्मिक मुद्दे मांडले होते ज्यांना वैयक्तिक स्तरावर, आप्त स्तरावर, सामाजिक स्तरावर, धार्मिक स्तरावर व जागतिक स्तरावर प्रत्यक्षात आणावयाचे आहे. त्यामध्ये बापूंनी एका खूप महत्त्वाच्या मुद्यावर आपल्या सर्वांचे लक्ष केंद्रित केले होते, ते म्हणजे संपर्क साधण्यासाठी ’चांगल्या प्रकारे इंग्लिश भाषेत बोलायला शिकणे’. 
आज जगाच्या व्यवहारामध्ये इंग्रजी भाषा ही संपर्कव्यवस्थेसाठी सर्वात जास्त वापरण्यात येणारी भाषा आहे. आजच्या घडीला कुठलाही व्यवहार करण्यासाठी संपर्कव्यवस्था ही चोख असावीच लागते. त्यामुळे आज ना उद्या लोकांसाठी इंग्रजी भाषेशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही. आज इंग्रजी ही बोली भाषा नसणार्‍या देशांमध्येही मोठमोठ्या बॅनरच्या कंपन्यांनी इंग्रजी भाषेशी जुळवून घ्यायला कधीच सुरुवात केली आहे. आमची इंग्रजी भाषा ही जर ओघवती नसेल, तर आमचा जगाच्या व्यवहारामध्ये टिकाव लागणार नाही; मग भले आमच्याकडे कितीही मोठ्या डिग्री असतील. आज सॉफ्टवेअर प्रोग्रॅमिंग क्षेत्रात भारत चीन पेक्षा सरस ठरतोय त्याचे कारण हेच की भारतीय प्रोग्रॅमर्सचे चिनी माणसांपेक्षा इंग्रजी भाषेवर जास्त प्रभुत्व आहे. 

२००५ साली दैनिक ’प्रत्यक्ष’ जेव्हा पहिल्यांदा प्रकाशित झाला, तेव्हा बापूंनी स्पष्टपणे सांगितले होते की बदलत्या काळातील परिस्थितीशी अनभिज्ञ असणे म्हणजे अंधारात जगण्यासारखे आहे आणि अंधार हा नेहमीच घातक असतो. त्याने आपले जीवन उद्ध्वस्त होऊ शकते. म्हणूनच सर्व श्रद्धावानांच्या भल्यासाठी डॉ. (सौ.) नंदा अनिरुद्ध जोशींनी (आपल्या लाडक्या नंदाईंनी) इंग्रजी भाषा शिकण्यासाठी, सुधारण्यासाठी आणि फुलवण्यासाठी ह्या पुस्तकांचा संच प्रकाशित केला आहे. ह्या पुस्तकांची आखणी अशा प्रकारे केली गेली आहे की नवशिक्या माणसाला ती समजण्यासाठी सोपी आहेतच, शिवाय रोजच्या व्यवहारात त्यांचा वापर करणेही सुलभ होणार आहे. ज्यांचे इंग्रजी भाषेवर प्रभुत्व आहे, अशा लोकांसाठीसुद्धा ही पुस्तकं उपयुक्त ठरणार आहेत. 
ही पुस्तकं श्रीअनिरुद्ध गुरुक्षेत्रम येथे विक्रीसाठी उपलब्ध आहेतच; शिवाय इच्छुक www.aanjaneyapublications.com ह्या साईटवरही पुस्तकं ऑर्डर करू शकतात

Thursday 29 August 2013

बापू अलोट शक्तीचा स्रोत – आमचा ‘साहेब’



मल्लखांब, जिम्नॅशियम्, तलवारबाजी, दांडपट्टा, प्राच्यविद्या, बलविद्या, क्रिकेट आणि शरीरशास्त्राचे निष्णात व्यक्तीने योग्य मार्गदर्शन करणे म्हणजे साहेबांनी याविषयी बोलणे. शारीरिक बळाबरोबर मानसिक बळही विकसित करण्याची दक्षता घेणे म्हणजे, साहेबांनी विचार करणे. शक्तीसामर्थ्य विकसित करतानाच प्रत्येकाचे मन राखण्याची मृदुता दाखविण्याचे दोन टोकाचे गुण दर्शविणारा हा आमचा ‘ह्युमंगस्’ साहेब.

मल्लखांब असो अथवा, प्राच्यविद्या असो किंवा बाकी काही, व्यायामाचे गार्डिअन्स्‌ नाहीत. तर, साहेबांकडे आजही आम्ही व्यायामाची सुरुवात म्हणून पाहतो. ‘बापू’ हीच सुरुवात असावी या सर्वाची.

साधारण १९८७ मध्ये मी आणि धनेशने शिवाजी पार्कमधील समर्थ व्यायामशाळेमध्ये प्रवेश घेतला. त्यावेळी मी पाचवीत होतो आणि धनेश तिसरीत होता. १९९५ पर्यंत कुस्ती, ज्युडोच्या राज्यस्तरीय, राष्ट्रीय स्तरावरील बर्‍याच स्पर्धांमध्ये भाग घेतला. १९२३ मध्ये स्थापन झालेल्या या समर्थ व्यायाम मंदिरमधूनच आम्ही अनेक स्पर्धात सहभागी झालो. समर्थच्या खेळाडूंना क्रीडाक्षेत्रात मोठा मान होता. क्रीडाक्षेत्रात भारताचे नाव करणार्‍या अनेक खेळाडूंना समर्थने घडविले आहे. आमचे वडिलही व्यायामक्षेत्रातच होते. १९७० मध्ये ते ‘महाराष्ट्र श्री’ होते. त्यामुळे व्यायामाची आवड आम्हाला घरातील वातावरणामुळेच लागली होती. समर्थमध्ये मल्लखांब शिकण्यास सुरुवात केली. कोणत्याही स्पर्धेत उतरायचे असेल तर त्याची पहिली पायरी मल्लखांब-जिम्नॅस्टिक आहे. संपूर्ण शरीराला व्यायाम देणारे हे मल्लखांब-जिम्नॅस्टिक हे ‘मदर ऑफ स्पोर्टस्’च आहे. आजही कोणाला खेळात रिसर्च करायचा असेल, तर स्पोर्टस् मेडिसिन किंवा स्पोर्टस् फिजिओलॉजीचा अभ्यास करायचा असेल तर अनेक डॉक्टर मल्लखांबाचे निरीक्षण करतात. केवळ भारतातीलच नव्हे, तर परदेशातील डॉक्टरही मल्लखांब अभ्यासताना दिसतात. हेच मल्लखांब शिकत असताना अनेक डॉक्टर येऊन समर्थच्या आम्हा मल्लखांबपटूंना धडे द्यायचे. शरीरशास्त्र समजावण्याचा त्यांचा नेम असायचा. स्पोर्टस् मेडिसिन देऊन काही निरिक्षण करण्याची प्रॅक्टिस करण्यासाठी हे डॉक्टर व्यायामशाळेत यायचे. फळ्यावर शरीररचनेच्या आकृती काढून समजवायचे. पण, ते वय असे होते की तेव्हा अशी थिओरेटिकल लेक्चर्स डोक्यावरून जायची. त्यामुळेच हे क्लास आम्हासारख्यांना नेहमीच कंटाळवाणे वाटायचे.

अशातच राष्ट्रीय स्तरावरील शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही मल्लखांब शिकत होतो. अशाच एका सरावाच्या वेळी आमचे सर कै. शशिकांत रावणंग यांनी आम्हाला शाळेत एक डॉक्टर आले असल्याचे सांगितले. मे, १९९५ च्या त्या सुमारास सरांनी आम्हाला डॉक्टरांना भेटायचे असल्याचे सांगितले. सरांनी सांगितले तर ते करायचेच ही शाळेची शिस्त होती. त्यामुळे चला अजून एका डॉक्टरांना भेटायचे, आणि आता हे काय नवं सांगणार या विचारांनी आम्ही या डॉक्टरांना भेटायला गेलो. तेव्हा ते आमच्या श्रेयस सरांबरोबर बोलत होते. डॉक्टरांना भेटायला म्हणून गेलो तर तेथे दिसले काय?

तर, एक उंच धिप्पाड माणूस सरांशी बोलत आहे. त्यांना पाहून आम्हाला वाटले हा कोण आहे? कोणी मल्लबिल्ल किंवा रेसलर वगैरे आला आहे की काय भेटायला. त्यांना पाहून आम्ही दोन-चार मिनिटं त्यांच्याकडे पाहतच राहिलो. मग आमच्या एका मित्रानेच सांगितले, ‘हे डॉक्टरच आहेत’.

तेव्हा मग, आम्ही बापूंकडे लांबूनच पहात राहिलो. तेव्हा बापूंची तब्येत म्हणजे ऍब्स्युलिटली बघण्यासारखी होती. तेव्हा बापू असे होते, की बापू रस्त्याने चालत असले ना, की लोकं हातातली कामं सोडून बघत बसायची बापूंकडे; असे शरीरसौष्ठव होते त्यांचे. अशा बापूंना प्रथम पाहण्यापूर्वी आम्हाला वाटले होते, की कोणी शामळु डॉक्टर असेल, पण प्रत्यक्ष बापूंना पाहिले तर… ते जसे दिसले त्याने अचंबित झालो.

ज्युडो, रेसलिंग, जिम्नॅशियम आणि मल्लखांब अशा अनेक खेळात सहभागी होणार्‍यांपैकी आम्ही होतो. ‘स्पोर्टस् ऑथॅरिटी ऑफ इंडिया’च्या ताकदीच्या स्पर्धांतही आम्ही खेळायचो. आमचे सर तेव्हा २६-२७ वर्षांचे होते. त्यांनी आम्हाला एवढे तयार केले होते, की आमची ताकद त्यांनीच वाढविली होती. एकदा आमच्या व्यायामशाळेतील एक जुने झाडं उन्मळून पडले होते. जवळजवळ सत्तर-ऐंशी वर्षांचे ते जुनं झाडं मुलांच्या व्यायामाची जागा अडवून होते. ते एवढं मोठं जड झाड आम्ही दोघांनी मिळून उचलून बाजूला केले होते.

असे असताना त्या दिवशी श्रेयस सरांनी आमची ओळख व्यायामशाळेत आलेल्या डॉ.अनिरुद्ध जोशी यांच्याशी करून दिली. आमच्या व्यायामशाळेचे हे दोन ‘‘रेडे’’ योगेश आणि धनेश……

साहेब

साहेब – अनिरुध्द बापू

…अशीच ओळख श्रेयस सरांनी करून दिली. मग आम्ही बापूंकडे पाहत असतानाच ते प्रेमाने म्हणाले, ‘या बाळांनो.’

खर्ज्या आवाजात त्यांनी ‘या बाळांनो’ म्हणताच आम्ही शॉकच झालो. मग बापूंनी आमची तपासणी केली. यापूर्वी शाळेत येणारे डॉक्टर मुख्यतः सरांशी चर्चा करायचे किंवा माहिती सांगण्यासाठी वर्ग घ्यायचे. त्यांचा कधी मुलांशी थेट संवाद नव्हता. आमच्यासारख्या मुलांची स्वतः तपासणी करणारे, स्वतः मुलांना प्रात्यक्षिक दाखवून समजावणारे हे पहिलेच डॉक्टर होते, आमचे साहेब अर्थात डॉ.अनिरुद्ध जोशी. आम्हालाही त्यांच्याविषयी कुतुहल जागे झाले, हे नक्की कोण आणि करणार काय हे साहेब?

आम्ही जेव्हा बापूंना पहिल्यांदा पाहिले, तेव्हापासूनच त्यांना आम्ही साहेबच म्हणायचो. ते आजतागायत आमचे साहेबच आहेत. डॉ.अनिरुद्ध जोशी नावाने त्यांची आमची ओळख झाली. पण, आम्ही कधी त्यांना डॉक्टर म्हणूनही हाक नाही मारली. आम्ही त्यांना ‘साहेब’च म्हणायचो.

साहेब, उद्या काय करू? क्लिनिकवर येऊ का? साहेब तुम्ही हे सांगाल का? साहेब आमचे हे दुखतं आहे. तिथपासून आजपर्यंत आजही साहेबच आहेत.

योगेश १६ वर्षांचा होता आणि मी १४ वर्षांचा असताना आमची आणि बापूंची ओळख झाली. तेव्हा आम्ही दोघं मिळून चारशे किलो वजनही उचलायचो. अशा आमची तपासणी करून, मग हे डॉक्टर एखादा सर्वसामान्य माणूस उभा राहतो तसेच पण दोन्ही हात समोर करून उभे राहिले आणि आम्हाला म्हणाले, ‘आता मला खेचा’.

आम्ही दोघांनी डॉक्टरांचे दोन्ही हात पकडून त्यांना खेचण्याचा प्रयत्न केला. ते जागचे हलत नव्हते, म्हणून आम्ही मग रागानेच सर्व शक्ती पणाला लावून त्यांना खेचले, मात्र तरीही आम्ही डॉक्टरांना सूतभरही खेचू शकलो नाही.

आम्ही हैराण झालो असतानाच, मग डॉक्टरांनी एक हात खाली केला. दुसरा हात तसाच हवेत ठेऊन त्या हाताला पकडून आम्हाला दोघांनाही एकत्रपण खेचण्यास सांगितले.

तीनशे-चारशे किलो उचलण्याची क्षमता असलेल्या आम्हा दोघांनीही, डॉक्टरांनी पुढे केलेला हात धरून त्यांना ओढण्याचा प्रयत्न केला. खरं तर, आमची व्यायामशाळेतील सर्वात ताकदवान मुलं म्हणून गणना व्हायची. पण, या ताकदीच्या परीक्षेत आम्ही हरलो. २००-३०० किलो सहजपणे उचलणारे आम्ही २ रेडे त्या दिवशी एका चाळीशीला पोहोचलेल्या डॉक्टरच्या ताकदीपुढे हरलो होतो. आमच्या मनात कुतुहल होते, आश्‍चर्य वाटले होते. एका डॉक्टरमध्ये एवढी ताकद कशी?

आज या घटनेला पंधरा वर्षे लोटली आहेत. आम्ही तिशीच्या भरात असताना, आमचे साहेब डॉ. अनिरुद्ध जोशींनी पन्नाशी ओलांडली आहे. या काळात बापूंनी केलेल्या मार्गदर्शनामुळे, आज आमची वजन उचलण्याची क्षमता दुप्पट झाली आहे. तेव्हा तीनशे किलो उचलायचो, तर आज सहाशे किलो उचलण्याची आमची क्षमता आहे. तरीही आजही पंचावन्नच्या टप्प्यावर पोहोचलेल्या या डॉक्टरसाहेबांना दोघांनाही त्यांच्या मर्जीविरोधात खेचून सूतभरही हलविणे, आम्हा दोघांना मिळूनही शक्य होत नाही. त्यांची आणि आमची ओळख झाल्यानंतर दीड-दोन वर्षानंतर डॉक्टरांची आणि आमची या ताकदीच्या कसोटीबाबत आमची चर्चा झाली. तेव्हा या साहेबांनी मला स्पष्टच सांगितले, ‘अरे, तू मला काय, माझा अंगठा जरी सूतभर हलवू शकलास ना तर तुला इतर काही करण्याची आवश्यकता नाही’. पण अजूनही आम्हाला ते शक्य झालेले नाही.

एवढेच कशाला, बापूंनी आमची निवड करून आम्हाला प्रशिक्षण दिले. त्यात त्यांनी आम्हाला प्राच्यविद्यांचीही ओळख करून दिली. प्राच्यविद्या पुनरुज्जीवित करण्यासाठी बापूंनी अभ्यासक्रम सुरू केला आहे. या अभ्यासक्रमातील मुलांनाही आम्ही प्रशिक्षण देतो. यातीलच एका कोर्सदरम्यान आमचे साहेब प्रशिक्षणस्थळी आले. तेव्हा १०८ प्रशिक्षणार्थी एका बाजूस आणि बापू एका बाजूस. असा ताकदीचा खेळ झाला. आम्ही १०८जण मिळूनही, तेव्हा आमच्या साहेबांना सूतभरही खेचू शकलो नाही.

एवढ्या अचाट ताकदीचे हे आमचे साहेब, व्यायाम कसा करायचा, हे प्रेमळपणे समजावायचे म्हणूनच आमच्यातील व्यायामाची गोडी कायम राहिली. व्यायाम कसा करायचा, एवढेच नाही तर मल्लखांब, जिम्नॅस्टिक अथवा व्यायाम करून होणार्‍या दुखापतींवर व्यायामानेच कशी मात करायची याचे धडेही आमचे साहेब द्यायचे. केवळ व्यायाम कसा करायचा याचेच धडे साहेब देत नव्हते, तर हे धडे देण्यापूर्वी त्यांनी स्वतः व्यायाम करून शरीर कमावले होते. त्यांचे खांदे ब्रॉड होते. छाती भारदस्त होती आणि पोटर्‍याही भरीव होत्या. एवढ्या जाड पोटर्‍या होत्या ज्या आमच्या दोन्ही हातातही मावू शकत नाहीत. त्यातही एकाचवेळी त्या दगडासारख्या कडक करतात आणि दुसर्‍यावेळेला कापसापेक्षा मऊ. ‘मसल कंट्रोल’चे यापेक्षा उत्कृष्ट कसब कोणी दाखवू शकत नाही. आता आम्ही शरीरसौष्ठवपटूंनाही मार्गदर्शन करतो, पण साहेबांसारख्या पोटर्‍या अजूनपर्यंत आम्ही पाहिलेल्या नाहीत.

आमच्या शरीराचा अभ्यास आणि खेळाकडे असणारा कल पाहून त्यांनी आम्हाला, ‘शरीरसौष्ठव’ या क्षेत्राकडे वळण्यास साहेबांनीच प्रवृत्त केले. त्या पुढील प्रत्येक भेटीत, मल्लविद्या, पुरातन भारतीय व्यायाम प्रकार, शरीरशास्त्र अशा अनेक विषयांचे अफाट ज्ञानकोशातील महत्त्वाचे भाग ते आम्हाला सांगत व शिकवत गेले. मुद्गल, सूर्यभेदन, वज्रमुष्ठी, तलवार, दांडपट्टा व मॉडर्न सायन्स अशा विविध विषयांवर तासन्तास बोलून ते वेगवेगळे पैलू आम्हाला स्पष्ट करून सांगायचे. ते जी माहिती सांगायचे, त्यातील बहुतांशी भाग आमच्या क्षेत्रातील तज्ञांनाही अवगत नसायचा. फक्त श्री समर्थ व्यायाम मंदिरातील राज्य व राष्ट्रीय खेळाडूंनाच नव्हे, तर इतर खेळाडूंनादेखील ते मोफत वैद्यकीय सल्ला देऊन मार्गदर्शन करायचे आणि आजही देतात. साहेब फक्त समर्थच्या मुलांना पहायचे नाहीत. चिपळूण, पुणे, रत्नागिरीहून येणार्‍या मल्लखांबपटूंनाही साहेबांनी नियमित तपासून मार्गदर्शन केले आहे. कधी कधी तर बापू सूचितदादांनाही आम्हाला लेक्चर देण्यास सांगायचे. मग सूचितदादा फिजिओलॉजी आणि ऍनोटॉमीविषयी आम्हाला आणि आमच्या सरांनाही आठवड्यात दोनवेळा २-२ तास मार्गदर्शन करायचे.

यादरम्यान, बापूंनी स्वतः दोन वर्षे हॉल बुक करून व्यायामाचे संशोधन केले. त्यानंतर बापूंनी आम्हाला जुन्या बलविद्यांची माहिती करून दिली. यातील काही विद्या तर आम्ही कधी ऐकल्याही नव्हत्या. त्यातही सूर्यनमस्कार हा बापूंचा सर्वात जास्त आवडता विषय. २०-२२ दिवस रोज ते आम्हाला एकएक तास सूर्यनमस्काराबाबत माहिती द्यायचे. सूर्यनमस्काराचेही प्रकार असतात. तेव्हा आम्ही चतुरांग नमस्कार घालायचो. इतर प्रकार त्यांनीच आम्हाला सांगितले. चतुरांग सूर्यनमस्कार आम्ही घालायचो त्याची पद्धत वेगळी होती. अष्टांग सूर्यनमस्काराचीही त्यांनी आम्हाला ओळख करून दिली. वीरभद्र सूर्यनमस्कार कसा असतो, सूर्यनमस्कार ही सूर्यभेदनाची कशी पहिली पायरी आहे. कोणता सूर्यनमस्कार केल्याने कसा फायदा होतो, हे विज्ञानाच्या आधारे डॉक्टर आम्हाला समजावायचे. ते जी माहिती देत, त्यातील बरीचशी माहिती कोणत्याही पुस्तकात आम्हाला आढळलेली नसायची.

मल्लखांबाचे विशिष्ट प्रकार विशिष्ट वेळेत केल्यास, त्याचे खूप फायदे होतात. पण हे प्रकार आणि त्याचे फायदे फार कमी आम्हाला ठाऊक होते. आमचे श्रेयस सरही म्हणायचे अरे जे काही डॉक्टरांनी आज सांगितले, ते मी प्रथमच ऐकतो आहे. त्यांचे ते ज्ञानही त्यांच्या शारीरिक क्षमतेप्रमाणेच अफाट आहे.

साहेब कधी काय सांगतील, याचा नेम नसतो. आम्हाला मार्गदर्शन करताना बापू सांगायचे अरे पाणी प्यारे. पाण्याचे महत्त्व काय? तुम्ही जास्त पाणी प्यायला पाहिजे. धनेशला एक दिवस अवचितच साहेब भेटले. त्यांनी विचारले, अरे तू पाणी कमी पितोस का? धनेश त्यांना म्हणाला, ‘अहो रोज तीन-साडेतीन लीटर पितो’. त्यावर ते म्हणाले अरे आता महिना कोणता सुरू झाला, ऑक्टोबर आहे आणि उष्ण प्रवृत्तीची माणसं आहात तुम्ही. तुला पाणी किती लागेल. अजून दहा ग्लास पाणी वाढव. हे जे त्यांचे सांगणे आहे ना, हेच प्रॅक्टिकल आहे. आजच नाही तर तेव्हाही पूर्वीही, कधी बापूंना भेटण्यासाठी गेल्यास नुसता दरवाजाही उघडला, तरी साहेब मी काही सांगायच्या आधीच बोलायचे, अरे आज तुझा हात दुखतो आहे ना, जा ही गोळी घे, हे कर, तिळाचे तेल लाव. काही भेटू बिटू नकोस. जा इथून निघून. असे बर्‍याचदा व्हायचे. आमचे प्रॉब्लेम आम्ही सांगायच्या आधीच साहेब त्या प्रॉब्लेमचे सोल्युशन सांगून आमची रवानगी करायचे.

योगेश एकदा बापूंच्या परळमधील क्लिनिकला गेला होता. तेव्हा त्याला पाहताच बापू म्हणाले, ‘अरे हे काय? आठवडाभर तू तूप भरपूर खाल्लं आहे. जा तूप कमी कर.’ असं काही सांगितल्यावर डोकं खाजवायला लागायचं अरे, ‘हे साहेब, असे कसे सर्व काही स्वतःच सांगतात?’

अरे तू असा व्यायाम करत होतास. तू असे करायला हवे होते. असं सांगून साहेब आमच्या चुका आम्हाला दाखवून द्यायचे. हे सुरवातीचे दिवस होते. तेव्हा आम्हाला माहितही नव्हते, साहेब प्रवचन करतात, ते कोण आहेत वगैरे. हे समजायच्या पूर्वीच आम्ही असे काही अनुभवले, की साहेबांबाबत क्युरिओसिटी वाटायची.

आमच्या व्यायामशाळेतील एक मुलगी काही काळातच, छत्रपती पुरस्कारासाठी पात्र ठरणार होती. तर एका स्पर्धेपूर्वी आमच्या श्रेयस सरांनी अदितीला दोन दिवसानंतर गोल्ड मेडल मिळणार असल्याचे साहेबांना सांगितले. साहेब म्हणाले, अरे ती स्पर्धा खेळेल तर ना? तेव्हा आम्हाला प्रश्‍न पडला, अरे साहेब असे का म्हणाले? दोन दिवसांनी स्पर्धा होती त्यामुळे दुखापत होऊ नये म्हणून आम्ही सराव करीत नाही. त्यामुळे आदिती स्पर्धेत न खेळण्याचा प्रश्‍नच नव्हता. सर्वांना आदिती गोल्ड मेडल घेणार हा विश्‍वासही होता. पण, स्पर्धेपूर्वी फ्लॅगमार्च करतानाच आदितीचा पाय खड्ड्यात पडल्याने मुरगळला. तिचा गुडघा फ्रॅक्चर झाला आणि तिची स्पर्धा हुकली. तेव्हा काही इंज्युरी झाली तरी आम्ही डॉ. जोनना – साहेबांना फोन करायचो. आदितीचा पाय फ्रॅक्चर झाल्यावर आम्ही फोनवर त्यांना सांगितले. ते म्हणाले, हो मला कळलं. असं बोलून ते स्वतः आले. कालांतराने तिलाच ब्लड कॅन्सर झाला. पण आजही, ‘ऍट द एज ऑफ ३२ शी इज इन अमेरिका, अँड फिट अँड फाईन’
मध्यंतरी माझं काफ मसल फाटला. डॉक्टरांनी ऑपरेशन करायला सांगितले होते. पण, साहेबांनी मला फक्त तीन आठवडे पोहायला सांगितले. त्यानंतर मी सुचितदादांकडे गेलो. त्यांनी सांगितले, जा आता काही होणार नाही. नंतर माझी पोटरी कधीच दुखली नाही. एवढेच काय, बलविद्येत कित्येकांना प्रदीर्घ प्रयत्नांनीही कसब प्राप्त होत नाही. तर, केवळ पाचवेळा मार्गदर्शन करून साहेब आम्हाला तयार करायचे.

काही वर्षांनी आम्हाला समजले, डॉक्टर प्रवचन सुरू करणार आहेत. आमचे हे डॉक्टर खेळाचे मार्गदर्शक, अचानक प्रवचन देणार आहेत. हे आमच्या तेव्हा पचनी पडले नाही. कुतुहलाने आम्ही ते प्रवचन ऐकण्यास शशिकांत सरांबरोबर एका गुरूवारी गेलो. विज्ञान व अध्यात्म यांची सांगड त्यांनी प्रवचनातून घालून दिली होती. नंतर आमच्या जीवनातील त्यांचा ‘‘डॉक्टर’’ ते ‘‘बापू’’ हा प्रवास सहज झाला. कारण आमचे त्यांच्याशी असलेले नाते हे प्रेमाचे, विश्‍वासाचे व आदराचे होते. शशिकांत सरांचे मन साहेबांनी सशक्त केले. याच मनाच्या शक्तीच्या आधारे सरांनी आपले अपंगत्व दूर सारले आणि बापूंची उपासना व भक्ती केली आणि राष्ट्रीय स्तरावरील अनेक मल्लखांबपटू घडविले.

पुढे बापूंचे कार्य वाढत गेले. तरीही दर गुरूवारी प्रवचन संपल्यावर निघताना त्यांनी शशिकांत सरांना शेवटपर्यंत हातावर प्रसाद देणे सोडले नाही.

व्यायाम शिकविण्याबरोबरच साहेब क्रिकेटपटूंनाही मार्गदर्शन करायचे. शिवाजी पार्कवर उत्सुकांना ते प्रशिक्षण द्यायचे. अनेकांना फास्ट बॉलिंगचे धडे साहेबांनी दिले. त्यावेळी यशस्वी फास्ट बॉलर होण्यासाठी तंत्रशुद्ध पद्धती कशी असावी, याचे फ्रिमध्ये धडेही ते द्यायचे. फास्ट बॉलिंग ‘कायनॉसॉलॉजी’वर आधारीत आहे. ‘कायनॉसॉलॉजी’ म्हणजे बॉडी ऍक्शनचे सायन्स आहे. यानुसार शरीराची हालचाल योग्यप्रकारे झाल्यास फास्ट बॉलिंग करणे कसे शक्य होते, याचे ते शिक्षण द्यायचे. तेव्हा बापूंचा व्यायामही जोरदार असायचा.

साहेबांकडे असलेले त्यावेळचे नॉलेज आणि ते समजावण्याचे कसब इतरांकडे तेव्हाही नव्हते आणि आजही नाही. बापू कुस्ती खेळतो, कुस्तीचे सर्व प्रकार सांगतो, तो दांडपट्टाही चालवतो, तो मल्लखांबही जाणतो, तो तितकीच सुंदर तलवारही चालवतो. पूर्वी साहेब दगडावरही घाव घालायचे. कातळावर सराव करण्याचा हा प्रकार आहे, वज्रमुष्ठी. एवढे सर्व करणारे आमचे साहेब आमच्यासमोर कितीकिती प्रकारे आले आहेत.

असेच एकदा समोर येणार्‍या बापूंची पँट गुडघ्यापर्यंत फाटलेली दिसली. साहजिकच आम्ही चौकशी केली, काय हो काय झाले. आम्ही विचारता आम्हाला कळले, वाटेत एक बैलगाडी खड्ड्यात पडली होती. त्या गाडीच्या बैलाला उचलून बापूंनी खड्ड्यातून बैलाची सुटका केली. अडीचशे-तीनशे किलोच्या त्या बैलाला खड्ड्यातून बाहेर काढण्याच्या प्रयत्नात असताना त्यांची पँट फाटली होती. आमचे साहेब कसे आहेत, याचे आणखीन एक उदाहरण. आज गेले पंधरा वर्षे आम्ही बापूंचे मार्गदर्शन घेत आहोत. दरम्यान, परळचे क्लिनिक दादरमधील राममारुती रोडवरील नवनीतमध्ये आले. एके दिवशी बापू तेथे भेटले असताना बापूंच्या हाताच्या बोटांमध्ये दोन अंगठ्या दिसल्या. त्यातील एका बोटातील अंगठी निळ्या रंगाची प्लॅस्टिकची होती. तर, दुसर्‍या बोटातील अंगठी हिर्‍याची होती. बापूंच्या हातावर नजर पडल्यावर दिसणार्‍या या अंगठ्या, बघणार्‍याच्या मनात कुतुहल निर्माण करायच्या. हे कुतुहल आमच्या मनातही निर्माण झालेच. आम्ही बापूंना त्या प्लास्टिकच्या अंगठीबाबत विचारले. तेव्हा बापूंनी सांगितले, प्रवचनाला येणार्‍या एका गरीब वृद्ध स्त्रीने त्यांना ती प्लास्टिकची अंगठी भेट दिली होती. एका बोटात लाख रुपयांची हिर्‍याची अंगठी आणि दुसर्‍या बोटात ही लाख मोल असलेल्या प्रेमाची अंगठी घालूनच बापू तेव्हा सर्वत्र फिरत होते. कुठे मेडिकल कॉन्फरन्सला जायचे असो, अथवा क्लिनिकमध्ये पेशंट तपासायचे असो, बापू या दोन्ही अंगठ्या बोटात घालूनच सर्वत्र हिंडायचे.

शरीराची प्रचंड ताकद आणि त्याचवेळेला मनाचा मोठेपणा असणारा असा प्रेमळ ‘साहेब’ आमच्या नजरेत तरी दुसरा कोणी नाही. सद्‌गुरू तर ते आहेतच. पण, त्यापेक्षा जास्त आम्ही त्यांचे फॅन आहोत. कित्येकजण आम्हाला विचारतात, तू का गेलास बापूंकडे? आम्ही आलो कारण आम्ही फॅन होतो त्यांचे. १९९५ ला तर आम्ही त्यांना सांगायचो, तुमचा हात दाखवा. मग ते दाखवायचे. अगदी हत्ती आला तर कसे आपण करू, तसंच त्यांच्याबरोबर आम्ही करायचो. कधी त्यांना मारायचो. मग ते हात आणि खांदा कडक करायचे. पिनाबिना पण आम्ही टोचल्या आहेत त्यांच्या खांद्यात. पण, काही नाही. मार्क नाही. व्रण नाही. साधा एक ओरखडाही त्यांच्या अंगावर उमटायचा नाही. एखाद्याला विश्‍वास बसायचा नाही.

एकच माणूस तुमची तब्येत सांभाळतो, तोच माणूस तुम्हाला मार्गदर्शन करतो, तोच माणूस तुम्हाला ८० पौडांचा डंबेल्स नीट कसा मारायचा हे शिकवतो. तोच माणूस तुमच्याबरोबर कॉफी घेतो. तोच माणूस तुमच्याबरोबर वडापाव आणि समोसाही खातो. तोच माणूस तुम्हाला अफाट शक्ती आणि सामर्थ्याची चुणूक दाखवितो. वज्रदेहाची ओळख करून देतो. आणि स्वतःच्या वृत्तीतून प्रेम आणि जिव्हाळा म्हणजे काय, याचे दाखले देतो. हे सर्व एक माणूस करताना दिसणे एखाद्याला अशक्यही वाटावे. पण, हे सर्व केवळ एकच माणूस करताना आम्हाला दिसला, तो म्हणजे आमचा साहेब. एवढे सर्व करताना ते दिसू शकले, कारण साहेबांकडे शक्ती आणि ताकद आहे म्हणून नव्हे. त्यांच्याकडे ताकद आणि शक्ती तर आहेच. पण, त्याचबरोबर आहे प्रचंड प्रेम. त्यामुळेच हे ‘साहेब’ आहेत अलोट शक्तीचा स्रोत. ‘ह्युमंगस्’.

१७ वर्षे त्यांचे प्रशिक्षण घेताना जे आम्ही जाणले ते हेच.